James 1

निरनिराळ्या विषयांवर व्यवहार्य उपदेश

1याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.

2माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. 3तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.

4आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे.

5म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.

6पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. 8कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो.

9दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. 10आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. 11सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल.

12जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.

13कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.

14तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. 15मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते.

16माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.

17प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते. 18आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.

खरे धर्माचरण

19माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. 20कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. 21म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.

22वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. 24तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. 25परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.

26जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

27

Copyright information for MarULB